Maharashtra Mayor Election | राज्यातील महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रशासक राज असल्याने नव्याने निवडून आलेले नगरसेवक मोठ्या अपेक्षेने या पदांकडे पाहत होते. मात्र आरक्षण सोडत न झाल्याने महापौर निवड रखडली असून त्यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न अधांतरी लटकले आहे.
भाजपला महापालिकांत मोठे यश मिळाल्याने पक्षातील अनेक नगरसेवकांनी महापौरपदासाठी तयारी सुरू केली होती. अनेक ठिकाणी लॉबिंग, फिल्डिंग आणि आंतरिक हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अचानक ही प्रक्रिया थांबल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापौर निवडीला उशीर का होत आहे आणि ही निवड प्रक्रिया कधी पूर्ण होणार, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
आरक्षण सोडतीअभावी निवड प्रक्रिया रखडली :
महापौरपदाची निवड होण्यासाठी सर्वप्रथम आरक्षण सोडत जाहीर होणे आवश्यक असते. मात्र राज्य सरकारकडून अद्याप ही सोडत काढण्यात आलेली नाही. मागील पंचवार्षिक कार्यकाळात अनेक महापालिकांमध्ये खुल्या गटासाठी महापौरपद आरक्षित होते. त्यामुळे यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय गटासाठी आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Mayor Election News)
या अनिश्चिततेमुळे अनेक इच्छुक नगरसेवकांनी ‘देव पाण्यात ठेवले’ असल्याचे चित्र आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि अन्य महापालिकांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून आरक्षणामुळे आपल्यावर गदा येऊ नये, यासाठी अनेक राजकीय हालचाली सुरू आहेत. आरक्षण सोडत निघाल्याशिवाय कोणताही उमेदवार अंतिमपणे पुढे येऊ शकत नसल्याने ही प्रक्रिया थांबून राहिली आहे. (municipal corporation mayor news)
Maharashtra Mayor Election | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामुळे आणखी विलंब :
महापौर निवडीला उशीर होण्यामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा दावोस दौरा. मुख्यमंत्री १९ ते २३ जानेवारीदरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसला जाणार आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग विभागाचे प्रतिनिधीही या दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महापौर निवड प्रक्रियेवर निर्णय घेण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Mayor Election News)
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार दिवसांत आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्य सभा बोलावणे, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणे आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रियेला अजून २० ते २२ दिवस लागू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






