Siddhant Shirsat | राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावत, सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे. या आरोपांमुळे सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिद्धांत शिरसाटबाबत मोठा खुलासा
या प्रकरणात, सिद्धांत शिरसाट यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत महिलेवर लग्नासाठी दबाव टाकला, असा आरोप करण्यात आला आहे. “माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी माझं आयुष्य संपवेन,” असा धोशा सिद्धांत शिरसाट यांनी महिलेच्या मागे लावला होता. त्यांच्या या भावनिक ब्लॅकमेलिंगमुळे महिलेने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.
सिद्धांतच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून महिलेने लग्न केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण केवळ शारीरिक छळापुरते मर्यादित नसून, त्यात भावनिक फसवणुकीचाही मोठा पैलू असल्याचे यातून स्पष्ट होते. एका विवाहित महिलेला तिच्या पतीपासून वेगळे करून स्वतःशी लग्न करण्यास भाग पाडणे, हा एक गंभीर आरोप आहे, जो सिद्धांत शिरसाट यांच्यावर लावण्यात आला आहे.
Siddhant Shirsat ची महिलेला धमकी
या घटनेमुळे समाजातील भावनिक ब्लॅकमेलिंगचे आणि त्याचा व्यक्तीच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामाचे भयावह वास्तव समोर आले आहे. एका बाजूला लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित करणे आणि दुसऱ्या बाजूला आत्महत्येची धमकी देऊन भावनिक दबाव टाकणे, हे गंभीर गुन्हेगारी कृत्य मानले जात आहे.
या कायदेशीर नोटीसनंतर सिद्धांत शिरसाट यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्रीपुत्रावर असे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






