Weather Update | गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आता हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजपासून म्हणजेच २९ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होणार असून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसाची नोंद झाली होती. मात्र रविवारी म्हणजेच २८ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता ओसरू लागली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस या भागात फक्त हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळू शकतो.
संभाजीनगरसाठी यलो अलर्ट :
हवामान विभागाने फक्त छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Yellow alert) जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर उर्वरित सात जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा दिलेला नाही.
जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली (Hingoli) या जिल्ह्यांमध्ये फक्त मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
Weather Update | कोकण-मुंबईत मात्र पावसाचा जोर कायम :
मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होत असली तरी कोकण आणि मुंबईत मात्र मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईत २९ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. (Kokan Weather Update)
दरम्यान, नाशिक, पालघर, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.






