Laxman Hake | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून समाजात तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणासाठी मोठ्या आंदोलनाची हाक दिल्यानंतर मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी थेट जरांगे पाटलांना इशारा देत मोठी घोषणा केली आहे.
जरांगे यांच्या मागणीवर हाकेंचा आक्षेप :
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र ही मागणी बेकायदेशीर असल्याचा ठपका हाके यांनी ठेवला आहे. शासनाने जरांगे यांच्या मागण्यांचा तथ्यांच्या आधारे खुलासा केला नाही तर महाराष्ट्रात अराजक माजू शकते, असा इशाराही हाकेंनी दिला आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, जरांगे पाटलांची मागणी म्हणजे “मराठा समाजाला घेऊन ओबीसींचे अस्तित्व संपवणे” असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ओबीसी समाज मूक राहणार नाही. उलट जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाज दहापट संख्येने रस्त्यावर उतरेल, अशी जोरदार घोषणा हाकेंनी केली.
Laxman Hake | राजकीय पार्श्वभूमीवर शंका व्यक्त :
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटलांवर राजकीय रसद मिळत असल्याचा आरोप केला. “अजित पवारांचे आमदार जरांगे यांना रसद पुरवत आहेत. जरांगे मुख्यमंत्रीविरोधात आक्रमक आहेत, तरी सत्तेतले लोक त्यांना मदत करत आहेत” अशी टीका हाके यांनी केली. तसेच ओबीसी मंत्री एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी सज्ज आहे. दुसरीकडे ओबीसी नेते देखील आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने या संवेदनशील प्रश्नावर भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल, हे स्पष्ट झाले आहे.






