Maratha Reservation | मुंबई उच्च न्यायालयाच्या सक्त आदेशानंतर आज दुपारी पोलीस सक्रिय झाले असून “रस्ते खाली करा, तत्काळ निघा” असे लाऊडस्पीकरवरून आवाहन सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन सुरू असले तरी, न्यायालयाने दिलेल्या तीन वाजेच्या डेडलाईननंतर पोलिसांनी रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया गतीमान केली आहे.
आंदोलनकांची घोषणाबाजी विरुद्ध पोलिसांचा संयम :
मुंबईतील विविध भागांत पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरील गाड्या हलवण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी आंदोलक सहकार्य करत असून गाड्या बाहेर काढल्या जात आहेत. तर काही ठिकाणी “आमचे आंदोलन मोडून काढण्याचा डाव आहे” असा आरोप करीत आंदोलक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. घोषणाबाजी आणि पोलिसांचे आवाहन यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मनोज जरांगे यांनी स्वतःच कार्यकर्त्यांना रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला असला तरी, आंदोलकांनी काही अटी ठेवल्या आहेत. “आम्ही गाड्या नवी मुंबईत नेऊ, पण आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्यांसाठी पाणी, टॉयलेट आणि अन्न-पाण्याची सोय केली पाहिजे,” अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच अन्नपाणी पुरवणाऱ्या वाहनांना थांबण्याची परवानगी द्यावी, असेही आंदोलक म्हणत आहेत.
Maratha Reservation | कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांचा फौजफाटा :
सीएसएमटी, बीएमसी मुख्यालय आणि आझाद मैदान परिसरात पोलिसांची मोठी तैनाती करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत म्हणून पोलिस फक्त आवाहन व समजावण्याच्या भूमिकेत आहेत. “तुम्ही सहकार्य करा, आम्हीही सहकार्य करू” असा संदेश पोलिसांकडून आंदोलकांना दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, जरांगे यांनी पोलिसांची नोटीस नाकारल्याने आंदोलन आणखी तापण्याची चिन्हे आहेत.






