Maratha Morcha | मुंबईतील आझाद मैदान आज मराठा समाजाच्या लढ्याने तुडुंब भरले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले असून “आरक्षणाशिवाय माघार नाही” असा ठाम पवित्रा त्यांनी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला आणखी बळ मिळालं असून हजारो मराठा बांधवांनी मैदान खचाखच भरून टाकलं आहे. दरम्यान, उपोषणाची सुरुवात होताच बीड जिल्ह्यातील दोन आमदारांनी तातडीने सभास्थळी धाव घेत जरांगेशी चर्चा केली.
बीडच्या दोन आमदारांची उपस्थिती :
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) आणि प्रकाशदादा साळुंके (Prakash salunke) हे दोघे आमदार उपोषण सुरू झाल्यानंतर काही वेळातच आझाद मैदानावर पोहोचले. त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आणि माध्यमांशी बोलताना “सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे” असे सांगितले. यापूर्वीही हे दोन्ही आमदार जरांगे यांच्या आंदोलनांना सातत्याने पाठिंबा देत आले आहेत.
नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहून “सरकार मुद्दामहून चालढकल करत आहे. प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा” अशी मागणी केली आहे.
Maratha Morcha | मैदानाबाहेरही गर्दी :
आझाद मैदानात अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेक आंदोलक मैदानाबाहेरच रस्त्यावर आंथरूण टाकून थांबले आहेत. त्यामुळे केवळ मैदानच नव्हे तर संपूर्ण परिसर मराठा समाजाच्या लाटेने व्यापून गेला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनही हजारो मराठा बांधव निघाले आहेत. इगतपुरीच्या समृद्धी महामार्गावरून शेकडो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला असून, नाशिकहून आंदोलनासाठी रसद व्यवस्थाही केली जात आहे. (Maratha reservation)
मराठा समाजाच्या ‘ओबीसी प्रवर्गातून आरक्षण’ या प्रमुख मागणीसह सगेसोयरे अध्यादेश लागू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्धार केल्यानंतर आणि आमदार-खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर सरकारसमोर तातडीने निर्णय घेण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.






