Manoj Jarange | मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवा टप्पा मिळाला आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारवर कठोर शब्दांत निशाणा साधत थेट इशारा दिला – “आम्ही मराठ्याची औलाद आहोत. आरक्षणाशिवाय हटणार नाही. आता सुट्टी नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, जर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही, तर येत्या शनिवार-रविवारी राज्यभरातून मराठे मुंबईकडे रवाना होतील आणि सोमवारी मोठा स्फोटक मोर्चा पाहायला मिळेल.
सरकारवर रोष, आरक्षणाशिवाय पाऊल मागे नाही :
जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर आरोप केले की, आंदोलन दडपण्यासाठी भीती दाखवली जातेय. पण आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर टीका करताना म्हटलं की, “फडणवीस न्यायालयाला खोटी माहिती देतात. सरकारला नासकी सवय लागली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मी आझाद मैदानावरून उठणार नाही.”
जरांगे पाटील यांनी पुढे इशारा दिला की, “वेशीवर मराठे अडवले तरी ते शनिवार-रविवारी मुंबईत दाखल होतील. मग सोमवारी फडणवीस यांना कळणार नाही की कोण मुंबईकर आणि कोण मराठा. आंदोलक हुशार आहेत, कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचतील हे सरकारला समजणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange | सरकारशी चर्चेस तयार पण अटींसह :
जरांगे यांनी चर्चेसाठी तयारी दाखवली आहे, पण त्यासाठी हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेट दाखवण्याची अट त्यांनी घातली आहे. ते म्हणाले – “आमची सरकारसोबत चर्चेला तयारी आहे. ३०-३५ मंत्री नको, दोनच मंत्री या, त्यांचा आम्ही सन्मान करू. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेट दाखवा.” त्यांनी स्पष्ट केलं की, समाजासाठी पिढ्यानपिढ्या टिकेल असा ठोस निर्णयच हवा आहे. (Maratha Reservation)
मनोज जरांगे यांच्या विधानांमुळे सोमवारी आंदोलनाची दिशा आणि तीव्रता प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होऊ शकतात. त्यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची मोठी कसोटी लागणार आहे. जरांगे यांनी केलेला थेट इशारा लक्षात घेता, सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर मुंबईतील परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






