OBC Morcha | ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्यातील सर्व ओबीसी समाज (OBC Morcha) एकत्र येऊन महाएल्गार सभा घेणार आहे. या सभेचे आयोजन उद्या 17 ऑक्टोबर रोजी बीड येथे करण्यात आले असून, राज्यभरातील अनेक महत्त्वाचे ओबीसी नेते यात सहभागी होणार आहेत. मात्र, या सभेवर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्यांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका करत, “अलिबाबाच्या आहारी गेलेल्या ओबीसी नेत्यांनी आता माकडचाळे बंद करावेत,” असा थेट सल्ला दिला आहे. त्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या या सभेपूर्वीच वातावरण तापले आहे.
भुजबळ यांच्या नेतृत्त्वात सभा, जरांगेंचा हल्लाबोल :
ही महाएल्गार सभा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्त्वात बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण परिसरात पार पडणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि इतर अनेक ओबीसी नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. मात्र, याच सभेवर जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी भुजबळ यांना लक्ष्य करत “येवल्याचा अलिबाबा” अशी हिणवण केली आहे.
जरांगे म्हणाले, “अनेक चांगले नेतेही येवल्याच्या अलिबाबाच्या आहारी गेले आहेत. त्याच्या षड्यंत्रात हे नेते गुंतलेले आहेत. येवल्याचा अलिबाबा त्यांना काही बाहेर पडू देत नाही.” अशा शब्दांत त्यांनी भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्लाबोल केला. (Beed OBC Morcha)
OBC Morcha | ‘येवल्याचा अलिबाबा’चे प्रयोग आणि दबाव तंत्र? :
जरांगे यांनी पुढे आरोप केला की, काही ओबीसी नेते येवल्याच्या अलिबाबाच्या सांगण्यावरून वेगवेगळे प्रयोग करत आहेत. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव आणणे, हैदराबादच्या जीआरच्या आडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे, हे सारे त्याचाच भाग आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “अलिबाबाने आणि त्याच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी आता माकडचाळे बंद करावेत. समाजात फूट पाडणारी भाषा आणि कारस्थानं थांबवली पाहिजेत,” अशी मागणी जरांगे यांनी केली.
“बीडला जातीयवादाचा आखाडा बनवलं” — जरांगे यांचा आरोप :
जरांगे यांनी आपल्या टीकेत आणखी एक पाऊल पुढे टाकत, “भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीड जिल्ह्याला जातीयवादाचा आखाडा बनवलं आहे. सगळ्यांचा वापर करून घेत ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवत आहेत. आता कुणीही उठतो आणि त्या ठिकाणी सभा घेऊ लागतो,” अशी कडवी टीका केली.
त्यांनी सांगितले की, “सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकदेखील तिथे येत आहेत. त्यामुळे बीडमध्ये नव्या संघर्षाला खतपाणी घातले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.






