Manoj Jarange | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि त्यासाठी थेट धनंजय मुंडेंनी सुपारी दिली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आरोपी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. या क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.
जरांगे पाटलांनी म्हटलं की, “माझ्या अंगावर गाडी घालायची होती. हा सगळा प्रकार नियोजनबद्ध होता.” पत्रकार परिषदेत त्यांनी दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या – पहिल्या दोन आरोपींच्या आणि दुसरी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यातील संवादाची.
जरांगे पाटलांनी ऐकवली धक्कादायक क्लिप :
पहिल्या क्लिपमध्ये आरोपी म्हणतो, “साहेब, तुम्ही परळीला आलात का?” यावर धनंजय मुंडे म्हणतात, “नाही, अजून पुण्यात आहे. गरबड करू नका.” आरोपी पुढे विचारतो, “गाडीचं काय झालं?” त्यावर मुंडे उत्तर देतात, “नवीन गाडी देऊ शकत नाही, पण जुनी देऊ शकतो.” हा संवाद ऐकवून जरांगे पाटलांनी दावा केला की, हीच ती गाडी होती जी माझ्या अंगावर घालायची होती.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जरांगे म्हणाले की, “धनंजय मुंडेंना आमच्या ताफ्यात ही गाडी पाठवायची होती. त्यानंतर ही गाडी आमच्या अंगावर घालायची होती. जर ही क्लिप खोटी असेल, तर सीडीआर काढा – कोण कुठे होतं, कोण कुणाला भेटलं ते तपासा. सगळं स्पष्ट होईल.”
Manoj Jarange | “भाषण ठीक आहे, पण मुळावर उठू नका” – जरांगे :
जरांगे पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडेंचं माझ्याशी वैर नाही, पण तुम्ही माझ्या मुळावर उठवलं. मी सर्व गोष्टींसाठी तयार आहे. पण अशी प्रवृत्ती जातीसाठी आणि समाजासाठी घातक आहे.” त्यांनी थेट सरकारलाही आवाहन केलं की, “फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी याचा छडा लावावा. सत्य समोर आणलं पाहिजे.”
जरांगे यांनी अजित पवारांवरही (Ajit Pawar) थेट भाष्य केलं. “अजित दादा असे लोक पाळणार का? त्यांनाही शॉक बसला असेल,” असं ते म्हणाले. त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की, “तुम्ही शांत राहा, मी सगळं व्यवस्थित करतो. मला तुम्हाला मोठं करु द्या.”
राजकीय वर्तुळात खळबळ :
या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचा हा दावा गंभीर मानला जात आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) हे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्यांनी कायदेशीर पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर आता या प्रकरणाचा तपास करण्याचा दबाव वाढला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच राज्यात तणाव आहे, त्यात या नव्या क्लिपमुळे वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे.






