मराठा समाजाचं उपोषण सुरु; जरांगे पाटलाने सरकारला दिला इशारा

On: August 29, 2025 10:47 AM
Maratha Reservation
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आज (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली. तब्बल ४८ तासांचा प्रदीर्घ प्रवास करून ते आंतरवली सराटीहून मुंबईत दाखल झाले. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी मंचावर उभे राहून सरकारला थेट इशारा दिला – “मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्येच उपोषण सुरू ठेवेन.” (Manoj Jarange Patil)

आझाद मैदानावर ऐतिहासिक गर्दी :

मुंबईतील आझाद मैदान आज मराठा बांधवांच्या घोषणांनी दणाणून गेले. सकाळी दहा वाजता जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून उपोषणाला प्रारंभ केला. उच्च न्यायालयाने एकदिवसीय आंदोलनास परवानगी दिली असली तरी जरांगे यांनी स्पष्ट केले की, समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. “मुंबई आज मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.

जरांगे पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. कुठेही दगडफेक करू नका, दारू पिऊन धिंगाणा घालू नका. पोलीस आणि सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे, त्यामुळे आपणही शांततेने आणि संयमाने वागावे.” त्यांनी आंदोलकांना शिस्त राखण्याचे आवाहन करत म्हटले की, समाजाला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य टाळा.

Manoj Jarange Patil | आंदोलनाला बट्टा लावायचा नाही :

सरकारवर आरोप करताना जरांगे म्हणाले की, “काही जण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण आपल्या आंदोलनाला बट्टा लागू देणार नाही. हा लढा समाजाच्या हक्कांसाठी आहे, तो अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच राहील.” त्यांनी आंदोलनकर्त्यांना जागरूक राहण्याचा आणि बाह्य शक्तींना आंदोलनाचा गैरफायदा घेऊ न देण्याचा इशाराही दिला. (Manoj Jarange Patil  Live)

जरांगे पाटील यांनी आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार करत सांगितले की, “मी मरण पत्करायला तयार आहे, पण मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या डोक्यावर विजयी गुलाल पडत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही.” त्यांच्या या भाषणानंतर मैदानात उपस्थित हजारो मराठा बांधवांनी उत्स्फूर्त घोषणाबाजी करत आंदोलनाला अधिक बळ दिले.

News Title: Manoj Jarange Patil Warns from Azad Maidan: Will Not Leave Mumbai Until Demands Are Met, Begins Indefinite Hunger Strike

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now