Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लढ्याचा बिगुल वाजवत मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत दाखल झाले. तब्बल 48 तासांच्या अखंड प्रवासानंतर हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी आझाद मैदानात पाऊल ठेवले. सकाळी दहाच्या सुमारास तेथे दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी मंचावरून उपस्थितांना संबोधित केले. या क्षणाने संपूर्ण आझाद मैदान घोषणाबाजीने दणाणून गेले. (Manoj Jarange Patil)
बेमुदत आमरण उपोषणाचा निर्धार :
मंचावरून बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. मी मरण पत्करायला तयार आहे पण मागे हटणार नाही.” असं म्हणत त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाची सुरुवात केली. समाजाच्या न्यायासाठी सुरू झालेल्या या लढ्यात कुठलाही गोंधळ न करता शांततेने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. (Manoj Jarange Patil)
सरकारवर निशाणा साधत जरांगे म्हणाले, “सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते, म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं. आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही.” त्यांनी सरकारने उपोषणास परवानगी द्यावी आणि मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
Manoj Jarange Patil | आंदोलनाचा पुढील टप्पा :
आझाद मैदानावर सुरू झालेले हे उपोषण राज्याच्या राजकारणात मोठा कलाटणीबिंदू ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कासाठी आपलं जीवन पणाला लावलं असून या आंदोलनाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे.
तसेच हजारोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांनी ‘आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी मैदान दणाणून टाकले.






