Manoj Jarange | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याआधी राज्य सरकारने दिलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणावर आज कोर्टात सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी थेट आपलं स्पष्ट मत मांडत सरकारला आणि विरोधकांना खडसावलं.
जरांगे पाटील म्हणाले की, “कमिशनने मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र जे 10 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं, ते 50% च्या वर जातं. त्यामुळे ते आरक्षण टिकणार नाही. आम्ही वारंवार सांगतो की, 50% च्या वर गेलेलं आरक्षण कधीच टिकत नाही. देणारे आणि घेणारे तेच आहेत, म्हणजे सरकारच्याच हातात हा सगळा प्रकार आहे. पण ओबीसी आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवला आहे.”
“10 टक्के आरक्षण कसं पुरणार?” :
मराठा समाजाच्या लोकसंख्येचा संदर्भ देत जरांगे पाटील (Manoj Jarange) पुढे म्हणाले, “मराठ्यांना एक आरक्षण, दोन आरक्षण, तीन आरक्षण असं म्हणणं चुकीचं आहे. कारण आमचा समाज संख्येने मोठा आहे. ओबीसी प्रवर्गात असूनही आम्ही राज्यात 50 ते 55% आहोत. या मोठ्या समाजाला फक्त 10% आरक्षण कसं पुरणार? त्यामुळे अशा पद्धतीने गोंधळ निर्माण करणं योग्य नाही. नेत्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे.”
त्यांनी स्पष्ट सांगितलं की, 10 टक्क्यांच्या आरक्षणाच्या नावाखाली समाजाशी अन्याय होतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल तर ओबीसी प्रवर्गातून मिळालेलं आरक्षणच योग्य मार्ग आहे.
Manoj Jarange | छगन भुजबळांवर सडकून टीका :
यावेळी जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवरही (Chhagan Bhujbal) जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी, “काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत,” असं विधान केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, “भुजबळांवर बोलायला गेलं की माझं डोकंच सरकतं.
आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. पण तुला आता अक्कल उरलेली नाही. राजकारणी मराठे आणि गरीब मराठे यांच्यात गैरसमज पसरवण्याचं काम तूच करतोस. ते आमच्या दबावामुळे बोलत नाहीत, असं नाही. आम्ही फक्त समाजात ऐक्य टिकवून ठेवतो.”
या विधानाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.






