Manoj Jarange Patil | भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या भेटीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याच्या बातमीवर माझा विश्वास बसत नाही, मात्र अशी भेट झाली असेल तर सुरेश धस गद्दार आहे, अशी थेट टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील यांनी आणखी कठोर शब्दात सुरेश धस यांच्यावर हल्ला चढवला.
धस समाजासोबत दगा करत आहेत!- जरांगे पाटील
सुरेश धस यांनी समाजाच्या विश्वासाला तडा दिला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केला आहे. “मला विश्वास बसत नाही की, सुरेश धस हे धनंजय मुंडेंना भेटले असतील. धस यांनी समाजासोबत दगा करू नये. यानिमित्ताने मी एक आठवण करून देतो, पत्रकारांनी धस यांना विचारले होते की, पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? त्यावेळी धस म्हणाले होते – ‘अजिबात नाही.’ मात्र, त्यानंतर धस यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला. याच आठवणीने धस यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता,” असे जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) म्हटलं.
जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली असेल, तर हे समाजासाठी मोठे दुर्दैव असल्याचे मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. “मारेकऱ्यांना भेटायला जावे वाटणे, गुंडाची टोळी चालवणारे, मुडदे पाडणारे यांना भेटायला जाणे हे मोठे दुर्दैव आहे. पण जाऊ द्या, मनोज जरांगे पाटील आहेत ना! एवढा मोठा धोका देवेंद्र फडणवीस यांनीही दिला नाही,” असे जरांगे पाटील यांनी म्हणाले.
सुरेश धस गद्दारांच्या यादीत सहभागी झाले?- मनोज जरांगे पाटील
मुंडेंच्या विरोधात जी लाट आहे तिचा फायदा तुम्हाला झाला. आज तुम्ही हे सिद्ध करुन दाखवलं तुम्ही गद्दारच आहात. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर गद्दारांच्या यादीत जाल. आपलाच माणूस आपलीच मान तोडील, आपलाच माणूल हातात दिलेला हात, पोटऱ्यांपासून छाटून टाकील, असं मराठ्यांना वाटत नाही, मात्र हा विश्वासघात झाला असेल तर मराठे कदापि विसरणार नाहीत. एक लक्षात ठेवा मराठ्यांमध्ये यांना नीट करायची ताकद सुद्धा आहे, असं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट प्रत्यक्षात झाली असेल, तर ही भोळ्या-भाबड्या समाजाची फसवणूक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “या भेटीमुळे मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. राजकीय स्वार्थासाठी काही लोक समाजाच्या भावनांशी खेळ करत आहेत. मी याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करेन,” असे त्यांनी सांगितले.
धस आणि मुंडे यांच्या भेटीमुळे मराठा समाजात नाराजी पसरली असून, राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीमुळे धस यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
English Title: Manoj Jarange Patil Criticizes Suresh Dhas Meeting with Dhananjay Munde






