Gunaratna Sadavarte | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला हजारो समर्थकांचा पाठिंबा मिळत असून, मुंबईत प्रचंड गर्दी झाली आहे. “काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. मला गोळ्या घालल्या तरी चालेल पण आरक्षण घेऊनच जाणार,” असे ठाम विधान जरांगे यांनी केले आहे.
दरम्यान, या आंदोलनावर कायदेशीर पातळीवर कारवाई करण्याची तयारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सुरू केली आहे. त्यांनी यापूर्वी आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. आता त्यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी :
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रारही दाखल केली आहे. त्यांचा आरोप असा आहे की जरांगे यांनी उच्च न्यायालयाच्या अटी आणि पोलिसांनी घालून दिलेले नियम मोडले आहेत. 29 ऑगस्ट रोजी त्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच आंदोलन करण्याची परवानगी होती, पण त्यांनी ती अट मोडली.
याशिवाय सदावर्ते यांचे म्हणणे आहे की, जरांगे यांनी केवळ नियमांचाच भंग केला नाही तर कायद्याचाही भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
Gunaratna Sadavarte | राजकीय पुढाऱ्यांवरही बोट :
आझाद मैदानात 5000 पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी, रस्ता रोको आणि नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दलही सदावर्ते यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी आरोप केला की आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच, या आंदोलनाला राजकीय पातळीवर पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय जाधव, विजयसिंह पंडित, ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Manoj Jarange Patil)
यामुळे आता पुढील घडामोडी काय होतील, जरांगे यांच्या आंदोलनावर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई होईल आणि राजकीय वातावरणात याचा काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






