Manoj Jarange | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ची हाक दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेलगावातून शेकडो मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनाला ओबीसी समाजातूनही पाठिंबा मिळत असून, आंदोलकांनी १५ ते २० दिवस पुरेल एवढे रेशन सोबत घेतले आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे.
“आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही”
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या ओबीसी बांधवांनी ओबीसी नेते हाके, वाघमारे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे,’ असे म्हणत त्यांनी या नेत्यांना ‘कुत्रे’ असे संबोधून त्यांना ‘भूकू द्या’ असे म्हटले आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ आणि ‘जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत मराठा बांधव अंतरवाली सराटी मार्गे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईच्या आंदोलनात सहभागी होत आहेत.
मनोज जरांगे-पाटील हे वडीगोद्री फाट्यावरून मुंबईकडे निघाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे होणार असून, शहागड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. येथे क्रेनच्या साहाय्याने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून, हजारो मराठा बांधव त्यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.
जरांगे-पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे की, ‘मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांची प्रमाणपत्रेही दिली जात आहेत. त्यामुळे आता सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे.’ आता अटीतटीची लढाई होणार असून, आरक्षण घेऊनच परत येणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वेळेप्रमाणेच यावेळीही मराठा समाज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनामुळे सरकारला मोठा घाम फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता सरकार यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
News Title- Manoj Jarange Finally Heads Towards Mumbai






