Maratha Reservation | मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी आंदोलनाच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यातच जरांगे यांनी नितेश राणे यांना थेट ‘चिचुंद्री’ असा उल्लेख करत चर्चेला नवीन वळण दिले.
आंदोलनानंतर नितेश राणेंची भूमिका :
जरांगे पाटील यांचे उपोषण संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतल्याचे सांगितले.
राणे म्हणाले की, “आतापर्यंत मराठा समाजाने गुलाल उधळला तो फडणवीसांच्या काळातच. त्यामुळे प्रत्येक मराठा समाजातील नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत.”
Maratha Reservation | ‘चिचुंद्री’ विधानावर मौन :
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या ‘चिचुंद्री’ या थेट आरोपावर मात्र नितेश राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विषयावर उत्सुकता वाढली आहे. जरांगे यांनी आंदोलन संपल्यानंतर “एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच” असेही विधान केले होते. त्यामुळे पुढील काळात या दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सलग पाच दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.






