Manisha Bhidve | कळंब (Kalamb) येथे घडलेल्या मनीषा बिडवे हत्येच्या प्रकरणात आरोपी रामेश्वर भोसले याने पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. या गुन्ह्याचा तपास जसजसा पुढे सरकतोय, तसतसे त्यातील धागेदोरे बीडमधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाशी जोडले जात आहेत.
टॉर्चर, व्हिडिओ क्लिप्स आणि हत्या
रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवे (Manisha Bhidve) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो दाखवून मनीषा त्याला वारंवार छळत होती. 22 मार्च रोजी दोघांमध्ये झालेल्या वादातून परिस्थिती गंभीर झाली. त्या दिवशी मनीषाने त्याला शारीरिक शिक्षा देत उठाबशा काढायला लावल्याचा खुलासाही आरोपीने केला. याच घटनेनंतर संतापाच्या भरात आरोपीने तिची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी हत्येचं कारण अनैतिक संबंध आणि पैशांवरील वाद असल्याचं सांगितलं. मात्र, संतोष देशमुख प्रकरणाशी महिलेचा काही संबंध होता का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या मुद्द्यावर भाष्य टाळलं असून, तो तपासाचा भाग असल्याचं नमूद केलं आहे.
अंजली दमानिया यांनी केले खळबळजनक आरोप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मनीषा बिडवे हत्याप्रकरणात संतोष देशमुख यांना अडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्यानुसार, मनीषा बिडवे ही महिला वेगवेगळ्या ठिकाणी पाच नावे वापरत होती. त्या नावांमध्ये मनीषा बिडवे आणि मनीषा गोंदवले यांचा समावेश होता.
दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, बीडमधील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी वाल्मिक कराड या व्यक्तीकडून सर्व कट आखण्यात आला होता. संबंधित महिलेला आधीच तयार ठेवण्यात आलं होतं आणि तिचा वापर देशमुख यांच्याविरुद्ध करण्याचा प्लॅन ठरवण्यात आला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय आणि गुन्हेगारी स्तरावर मोठी खळबळ माजली आहे.






