Manikrao Kokate | राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
माणिकराव कोकाटे हे याआधी कृषीमंत्री असताना विविध वादांमुळे चर्चेत होते. शेतकरी कर्जमाफीवर केलेली वक्तव्ये आणि विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांचं खाते बदलत कृषी मंत्रालय काढून घेऊन क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. मात्र आता कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांचं संपूर्ण मंत्रिपदच संकटात सापडल्याचं चित्र आहे.
कोर्टाचा नेमका निर्णय काय? :
शासकीय कोट्यातील 10 टक्के आरक्षित सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
मात्र जिल्हा सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी हा निकाल दिला. या निर्णयानंतर कायदेशीर अडचणी वाढल्या असून, दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्यास लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांचं आमदारकीसह मंत्रिपदही जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Manikrao Kokate | 29 वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत :
हे संपूर्ण प्रकरण तब्बल 29 वर्षांपूर्वीचं आहे. 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे भासवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10 टक्के आरक्षित सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. ही सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेनंतर आता जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने राजकीय परिणामांची चर्चा रंगली आहे. आता माणिकराव कोकाटे पुढे उच्च न्यायालयात दाद मागतात की राजकीय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.





