Rape News | बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथील पेठ पुरा भागात एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिला गंभीर इजा पोहोचवल्याप्रकरणी पोलिसांनी रेहान खान मुक्तार खान (वय अंदाजे २४ वर्षे) याला अटक केली आहे.
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव राजा येथे चिकन सेंटर चालवणारा रेहान खान याने पेठपुरा भागात राहणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलीला, जी किराणा दुकानात अंडे घेण्यासाठी आली होती, ५० रुपयांची नोट दाखवून आपल्या दुकानात बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने घरी परतल्यावर घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
आरोपी आणि पीडित मुलगी एकाच समाजाचे असल्याने, ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त नागरिकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनवर सातशे ते आठशे लोकांचा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर पोलीस उपयुक्तांनी दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि पीडितेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठवले. नागरिकांचा वाढता रोष पाहता पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली.
Rape News | महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली :
दुसरीकडे, पुण्यातील खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरातही एका २७ वर्षीय महिलेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या ड्यूटीसाठी कामावर निघालेल्या महिलेला एका अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीने महिलेला या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत काही तासांतच आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली.






