Maharashtra Weather Update | राज्यातील वातावरणात सातत्याने मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव नागरिक घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवत राज्यात तापमानात चढउतार होण्याचा इशारा दिला आहे. काही भागांत थंडीचा जोर कमी झाला असला तरी अचानक गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी जाणवली होती, तर जानेवारीच्या सुरुवातीलाच अनेक भागांत अवकाळी पावसाचा अनुभव आला. सध्या दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून येत असून काही शहरांमध्ये उष्णतेचा पारा वाढत आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात थंडी कमी झाल्याची भावना असली तरी हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात तापमानात चढउतार, काही भागांत गारठ्याचा इशारा :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील काही भागांत तापमान घसरण्याची शक्यता आहे. हरियाणातील नर्नुल येथे देशातील सर्वात नीचांकी तापमान 3.0 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात धुळे येथे किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून परभणीमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील 24 तासांत राज्यात किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (cold wave north India)
पुणे शहर आणि परिसरात सध्या कमाल तापमान वाढताना दिसत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर उष्णतेचा त्रास अधिक होत आहे. त्यामुळे काही भागांत दमट वातावरणाची अनुभूती नागरिकांना येत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
Maharashtra Weather Update | उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रावरही परिणाम :
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक भागांत तीव्र थंडीची लाट पसरली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दाट धुके पडत असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 आणि 23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. या बदलांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवू शकतो. (IMD alert today)
दरम्यान, वाढत्या वायू प्रदूषणामुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत सायंकाळच्या वेळी आकाश धूसर दिसत असल्याचे चित्र आहे. हवामानातील बदल आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






