Maharashtra | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत, १ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांना आता बँकांचे चकरा मारण्याची, कागदपत्रांची धावपळ करण्याची आणि तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे. (Maharashtra Farmer)
महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले :
‘अॅग्रीस्टॅक’ ही देशभरात सुरू असलेली एक व्यापक योजना आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. या योजनेअंतर्गत, आतापर्यंत महाराष्ट्रातील १ कोटी १० लाख ८७ हजार ९९४ शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करण्यात आले आहेत.
या शेतकऱ्यांच्या सर्व माहितीचा एक डिजिटल डेटाबेस तयार झाला असून, यामध्ये जमीनधारणा, पीक माहिती, मृदास्वास्थ्य, हवामान आणि सरकारी योजनांचे लाभ अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. हा डेटाबेस पीककर्ज प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Maharashtra | ऑनलाईन कर्जप्रक्रिया मुख्य प्रणाली होणार :
मागील आठवड्यात केंद्रीय वित्त, कृषी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत ‘अॅग्रीस्टॅक डेटावर आधारित पीककर्ज वाटप’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे, आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली ही योजना थेट प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होणार असून, पुढील रब्बी व खरीप हंगामासाठी ऑनलाईन कर्जप्रक्रिया हीच मुख्य प्रणाली होणार आहे, ज्यामुळे कर्ज वाटप प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक वेळा ७/१२ उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, रहिवासी दाखले, बँक खाते तपशील आणि पीक पद्धती यासाठी अनेक ठिकाणी फेरफटका मारावा लागत होता. (Maharashtra Farmer Loan News)
आता मात्र हे सर्वच डेटा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्यामुळे कर्ज प्रक्रियेस लागणारी कागदपत्रे आपोआप उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांची वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून, कर्ज वाटप प्रक्रियेला वेग येणार आहे. या निर्णयामुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून, शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुकर होईल अशी अपेक्षा आहे.






