Weather Update | राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज (१७ सप्टेंबर) देखील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ((Today Weather Update)
मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे :
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज कोकण-गोवा पट्ट्यात, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रातीलही काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. (Maharashtra Weather Update)
दरम्यान, राजस्थानातील काही भागांतून मान्सून माघारी फिरला असला तरी महाराष्ट्रात अजून एक महिना मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील महिनाभर पावसाचे प्रमाण टिकून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही काळजी घेण्याची महत्त्वाची वेळ ठरणार आहे.
Weather Update | या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
आजच्या हवामान अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Rain Yellow Alert) देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि सातारा घाटमाथ्याचे भाग, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






