Maharashtra Weather Update | भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी 17 ते 20 डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असली तरी, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने सध्या थंडीची लाट ओसरली आहे. मात्र गारठा कायम असून पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली :
दरम्यान, राज्यात विशेषतः मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune Weather Update) हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. वाढते वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक ठरत असून, सर्दी, ताप, खोकला आणि घशात खवखव यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांनी नागरिकांना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे शहरात गेल्या काही आठवड्यांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्यम ते खराब श्रेणीत नोंदवला जात आहे. मात्र, ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत आवश्यक उपाययोजना राबवण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Maharashtra Weather Update | काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी :
थंडीच्या बाबतीत पाहिले तर, धुळे येथे राज्यातील नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये 6.5, परभणीमध्ये 7.2, जेऊरमध्ये 7.5 अंश तापमान नोंदवले गेले. नागपूर, भंडारा, पुणे, मालेगाव आणि यवतमाळ येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. विदर्भातही थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. (Cold Wave)
दरम्यान, हवामान विभागाने 17 ते 20 डिसेंबरदरम्यान उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, लडाख आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.






