Maharashtra Weather | भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विविध भागांना पुढील पाच दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः पुणे आणि मुंबईसह कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान २६ अंश सेल्सिअस ते दिवसा ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मुंबई उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कुलाबा येथील शहर वेधशाळेत कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
पुणे जिल्ह्यातील घाट भागात पुढील पाचही दिवसांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट लागू आहे. याचा अर्थ या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांसह गडगडाटी वादळे आणि काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि घाट विभागांसह, भारतीय हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. ‘ऑरेंज अलर्ट’ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे जिल्ह्यांसाठी पाच दिवसांसाठी ‘यलो’ इशारा जारी करण्यात आला आहे, ज्याचा अर्थ “सतर्क रहा किंवा सावधगिरी बाळगा” असा आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी हाच इशारा एक ते चार दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे.
सोलापूर शहरातही आज (२० मे) विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पुण्यात होर्डिंग कोसळले
रत्नागिरी जिल्ह्यातही आज (२० मे) सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर अवकाळी पावसाचे ढग जमा झाले. विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. समुद्रातील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. समुद्र किनारपट्टी भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहनांची वाहतूक गती मंदावल्याचे चित्र देखील दिसून आले. ढगांचा गडगडात व विजांच्या कडकडाटामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
दरम्यान, पुण्यातील सणसवाडी येथे काही वेळापूर्वी एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती, त्यानंतर फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही मुसळधार पावसामुळे एक फ्लेक्स कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुण्यात पावसाने पाणीच पाणी झाले असून, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
English Title: Extreme Rainfall Warning for Parts of Maharashtra; Pune-Mumbai Urged to Be Alert






