Maharashtra Weather | सध्या देशभरात हवामानात मोठे बदल होत असून महाराष्ट्रातही वातावरणाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोण-कोणत्या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसणार, पाहुयात- (Maharashtra Weather )
विदर्भात पावसाचा अंदाज
विदर्भात तापमानाचा पारा काही अंशांनी घसरला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) या सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे देखील वाहू शकतात.
सांगली शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला असून, मिरज आणि परिसरात उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातही रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हवामान स्थिती
पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील हवामान बहुतांशी कोरडे राहणार आहे. मात्र, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूर या भागांत तापमानात काही प्रमाणात घट होईल. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
तर मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. पुढील दोन दिवसांपर्यंत या भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, हवेत वाढलेला दमटपणा उष्म्याची तीव्रता वाढवू शकतो.
Title : Maharashtra Weather Thunderstorms and Rain Alert Issued






