Rain Alert | गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. हवामान खात्याने विदर्भासाठी पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातपासून बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra weather update)
Rain Alert | कोकणात पावसाची तीव्रता कमी :
दरम्यान, कोकण किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळल्यानंतर आता त्याची तीव्रता कमी होताना दिसत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात.
मात्र, ढगाळ वातावरण टिकून राहील अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला असून, यंदा 100 टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. (rain alert)
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी :
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. तर पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहणार असून, अधूनमधून पावसाच्या सरींची शक्यता आहे.
विदर्भातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नद्या, ओढे-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवांशी संपर्क ठेवावा, असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.






