Maharashtra Weather Update | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. आज मुंबईत वातावरण तुलनेने स्थिर असले तरी ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत स्थिर वातावरण :
मुंबईत सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत. जोरदार पावसाची नोंद नसल्याने शहरात पाणी साचलेले नाही आणि वाहतूकही सुरळीत सुरू आहे. आज दिवसभरात किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग साधारण 10 ते 15 किमी प्रतितास असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
ठाणे आणि नवी मुंबई भागात हलक्या सरी सुरू असून दुपारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या भागासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट घोषित केला आहे, येथे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात ठाण्यापेक्षा थोडा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असून वाऱ्याचा वेग 20 किमी प्रतितासपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update | कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर :
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांत आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी आधीच मुसळधार सरींचा अनुभव आला आहे आणि दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढू शकते.
दरम्यान, येथे किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.






