Maharashtra Weather Alert | मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मात्र आजपासून वाऱ्याची दिशा बदलल्याने पुढील ७२ तासांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून दुपारनंतर पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून दमट हवामान नागरिकांना जाणवेल. (Maharashtra Weather Alert)
ठाणे-नवी मुंबईत मुसळधार सरी :
ठाणे आणि नवी मुंबईत दिवसभर मुसळधार सरी कोसळणार आहेत. नेरुळ, वाशी, बेलापूर, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक विस्कळीत होऊ शकते. हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे. (Maharashtra Weather Alert)
पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारी व ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढली असून शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे. येथे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.
Maharashtra Weather Alert | रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात धोका वाढला :
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) दिला आहे. रायगडच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका कायम असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसासोबत वारेही वाहत आहेत. समुद्र खवळल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सलग तीन दिवस पावसाचा इशारा असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.






