Maharashtra Water Crisis | महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईने गंभीर रूप धारण केल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा ४० टक्क्यांच्या खाली आला असून जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. (Maharashtra Water Crisis)
वाढते पाणी संकट आणि धोक्याची घंटा
या वर्षी उन्हाळा सुरू होताच महाराष्ट्रावर पाणीसंकटाचे सावट गडद झाले आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्के पाणीसाठा उरलेला आहे. जागतिक तापमानवाढ, वाढते बाष्पीभवन आणि पाण्याची मागणी यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस झाला होता तरी यंदा एप्रिलमध्येच परिस्थिती गंभीर झाली आहे.
राज्यातील २९९७ धरणांमध्ये एकत्रित क्षमता ४०,४९८ दशलक्ष घनमीटर इतकी असली तरी सध्या फक्त ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या पंधरा दिवसांत जलसाठ्यात तब्बल ५ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागात परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती
- कोकण विभागात पाणीसाठा: ४४.३७%
- पुणे विभागात पाणीसाठा: ३०%
- नाशिक विभागात पाणीसाठा: ४०%
- मराठवाडा विभागात पाणीसाठा: ३५.८२%
- अमरावती विभागात पाणीसाठा: ४६%
- नागपूर विभागात पाणीसाठा: ३७.५५%
पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त ३० टक्के पाणीसाठा आहे. सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांतील ४४७ गावं आणि १३२७ वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या मागणीतही झपाट्याने वाढ होत असून अनेक भागांत घोटभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
धरणांमधील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याचा आरोप काही ठिकाणी होत आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे की, पाण्याच्या योग्य नियोजनावर भर देण्यात आला आहे. तरीही, वाढत्या उष्णतेमुळे जलसाठा लवकर आटण्याची चिंता कायम आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमधील पाणीसाठा तुलनेने चांगला आहे, पण सतत वाढणाऱ्या तापमानामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Title : Maharashtra Water Crisis Shocking Water Levels in April 2025






