PSI Gopal Badne suspended | फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरवला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी आपले जीवन संपवले असून त्यांच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तींवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप असल्याचे नमूद होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एसपींना फोन करून तातडीची माहिती घेतली आणि आरोपी PSI गोपाल बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. (PSI Gopal Badne suspended)
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही आरोपी PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे, तर प्रशांत बनकर सामान्य नागरिक आहे. या दोघांनाही तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईसाठी स्पष्ट आदेश दिले आहेत,” असे तुषार दोशी यांनी सांगितले.
राज्य महिला आयोग आणि गृह राज्यमंत्री यांची प्रतिक्रिया
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे. “घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करू,” असे चाकणकर यांनी सांगितले.
गृहमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “फलटण उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली असून सुसाईड नोट सापडली आहे. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आणि कायदेशीर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल,” असे पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. (PSI Gopal Badne suspended)
PSI Gopal Badne suspended | चौकशी आणि पुढील कारवाई
या घटनेनंतर सातारा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यांची अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पोस्टमार्टम अहवाल आणि तक्रारीचा सखोल तपास केल्यावर प्रकरणातील सर्व तथ्ये समोर येणार आहेत.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि महिला सुरक्षा क्षेत्रात गंभीर चिंता व्यक्त होत आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मृत्यूच्या कारणांबाबत प्रशासकीय आणि कायदेशीर चर्चा वाढली आहे.






