Schools Holiday | डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम विश्रांती आणि मौजमजेसाठी संधी मिळणार आहे. शालेय विद्यार्थी नेहमीच सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या वेळी त्यांची ही प्रतिक्षा अधिक गोड ठरणार आहे. (December school holiday)
राज्य सरकार, निवडणुका, आंदोलन आणि शासकीय आदेश या चार कारणांमुळे 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. मात्र ही सुट्टी नेमकी कुठे लागू होणार? कोणत्या तारखेला कोणत्या कारणामुळे शाळा बंद राहील? याची सविस्तर माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
2 आणि 5 डिसेंबरला निवडणुका व शिक्षक संपामुळे सुट्टी :
2 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे संबंधित मतदारसंघातील सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी शाळांची इमारत मतदान केंद्र म्हणून वापरली जात असल्याने ही सुट्टी देण्यात आली आहे. (Maharashtra school holidays)
5 डिसेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून टीईटी परीक्षा अनिवार्यतेविरोधात संप पुकारण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे, मात्र राज्य सरकारने अद्याप या बाबत कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी निषेध म्हणून शाळा बंद आंदोलन जाहीर केलं असून या दिवशी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाणार आहे.
Schools Holiday | 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि 7 डिसेंबर रविवार :
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशभरात पाळला जातो. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी लाखो अनुयायी दादर चौपाटीवरील ‘चेतना भूमी’ येथे दर्शनासाठी येतात, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. (December school holiday)
7 डिसेंबर हा रविवार असल्याने शाळांना नियमित सुट्टी असते. त्यामुळे 5, 6 आणि 7 डिसेंबर सलग तीन दिवसांचा एक लाँग वीकेंड विद्यार्थी अनुभवणार आहेत. या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कुटुंबाला वेळ देण्यासाठी किंवा छोटासा प्रवास करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील या सलग सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यातील विविध भागांमध्ये निवडणुका, आंदोलन आणि शासकीय निर्णयांमुळे शाळा बंद असल्याची माहिती संबंधित जिल्हा प्रशासनानेही जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या भागातील अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.






