Rain Alert | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर कायम असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Rain Alert)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट :
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने आज सकाळीच जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासोबतच पुणे, सातारा, सांगली परिसरातही पावसाचे ढग दाटले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल ७ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. केळी, कापूस, सोयाबीन आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून ३५ गावांमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न पाण्यात वाहून गेलं आहे. जालना शहरात अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालं आहे.
Rain Alert | मराठवाड्यात पावसाचा तडाखा :
उमरगा तालुक्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. जालना जिल्ह्याला १९ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट (Rain Yellow Alert) देण्यात आला आहे. काही गावांमध्ये अजूनही पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. (Maharashtra Rain Alert)
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी पंचवटी नगर, वसरणी भागातील घरांमध्ये घुसले असून महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ जणांचा बोटीद्वारे सुटका केली आहे. विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. सध्या १ लाख ६२ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.






