Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. ज्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी कायम आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी घरं पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून खरीप पिकं व उसाचे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने याच पार्श्वभूमीवर आगामी २४ ते २५ तासांसाठी गंभीर इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात यलो अलर्ट (Rain Yellow Alert) देण्यात आला आहे. उत्तर कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.
पावसाचे या स्थितीमुळे प्रशासन सतर्क :
या वाढत्या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात तब्बल ९० एकर उसाचे पीक पावसाच्या पाण्यात जमीन दोस्त झाले. तर देवळेगव्हाण, गाडगेगव्हाण, लोणगाव आदी भागात काल मध्यरात्रीपासून पावसाची संतधर सुरू राहिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासून थोडी विश्रांती मिळाली आहे. मात्र, ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुढील २५ तास नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे :
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. पूरग्रस्त भागात पंचनाम्याचे काम सुरू असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. काही ठिकाणी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाले आहे. गावोगावी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. (Maharashtra Weather Update)
राज्यात सुरू असलेल्या या पावसामुळे अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की पुढील २५ तास नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरीही लोकांनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.






