Maharashtra Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा पावसाने कहर माजवला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. सततच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, माती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांसाठी मोठा पावसाचा आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Alert)
तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारनंतर आता महाराष्ट्रावर या नव्या हवामान बदलाचा परिणाम दिसणार असल्याचे संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या मोंथा चक्रीवादळाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पाडला होता. त्याचे परिणाम अजूनही टिकून असताना, आता नवीन चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाचा मोठा अलर्ट :
बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रात ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे. या वाऱ्यांमुळे समुद्राची परिस्थिती खवळलेली राहील आणि अंदमान-निकोबार बेटांसह पूर्व किनारपट्टीवर परिणाम दिसून येईल.
भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतो, असा हवामान खात्याचा इशारा आहे.
Maharashtra Rain Alert | राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता :
चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पुढील २४ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार असून, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नवे चक्रीवादळ राज्यासाठी चिंता वाढवणारं :
‘मोंथा’नंतर हे दुसरं मोठं चक्रीवादळ ठरू शकतं. राज्यात आधीच पावसाचा अतिरेक झाल्यामुळे जमिनीची धूप, पिकांची हानी आणि नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या चक्रीवादळाचा प्रभाव आल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सरकार आणि प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती मिळते.
पर्यटक, बोट चालक आणि मच्छिमारांना हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एका मागोमाग येणारी ही चक्रीवादळं महाराष्ट्रासाठी हवामान संकट बनत चालल्याचं स्पष्ट होत आहे.






