Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागांत जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Rain Alert)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, त्यामुळे शेती आणि दैनंदिन जीवन दोन्हीवर परिणाम झाला आहे. मोंथा चक्रीवादळानंतर राज्यात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यावर पावसाचे ढग दाटून राहतील, असा अंदाज दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा :
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. तथापि, पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळत आहे. (Maharashtra Rain Alert)
Maharashtra Rain Alert | पुढील पाच दिवस तापमानात घट, हिवाळ्याची चाहूल :
ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे तापमान वाढते, पण यंदा हवामानाने अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘ऑक्टोबर हिट’ गायब झाल्याचे दिसले.
आता नोव्हेंबर महिन्यातही हीच स्थिती कायम आहे. पुणे (Pune Rain Update), नाशिक, नागपूरसह अनेक शहरांत थंडीची चाहूल लागली आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील पाच ते सहा दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घट नोंदवली जाईल. त्यामुळे राज्यभर हिवाळ्याची ठळक सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. विशेषतः किनारपट्टी भागांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






