Maharashtra Rain Alert | मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र असले तरी आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी महत्वाचे कारण नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
या आठवड्यात बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain Alert)
विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता :
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 14 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातील काही भागातही यावेळी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Rain Alert)
मुंबई आणि उपनगरांमध्ये 13 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Alert | राज्यातील पिकांसाठी महत्वाचा पाऊस :
जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे काही भागातील पिके कोमेजू लागली आणि शेतकरी चिंतेत आहेत. आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, निचरा व्यवस्थेतील अडथळे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (Maharashtra Rain Alert)
महाराष्ट्रासोबतच राजस्थान, दिल्ली आणि बिहारमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. बिहारमधील 14 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.






