Police Bharti 2025 | राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बराच काळ रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अखेर गती येत आहे. राज्य सरकारने यंदा मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली असून या भरतीत 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्जाची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने वयोमर्यादा संपल्यामुळे अपूर्ण राहिली होती, त्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. (Police Bharti Age Relaxation)
गृह विभागाने 10 सप्टेंबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून या निर्णयामुळे शेकडो उमेदवारांना थेट फायदा होणार आहे. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरच्या काही कारणांमुळे पोलीस भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती. अखेर या तरुणांच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
१५ हजार ६३१ पदांसाठी मोठी भरती :
राज्य सरकारने नुकताच पोलीस दलातील १५ हजार ६३१ पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीत पोलीस दलातील सर्व रिक्त पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी २०२४ पासूनची रिक्त पदे या प्रक्रियेत भरली जाणार आहेत. यात वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, ही मोठी सवलत ठरणार आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पोलीस शिपाई पदासाठी १२ हजार ३९९ जागा, पोलीस शिपाई चालकासाठी २३४ जागा, बॅण्ड्समनसाठी २५ जागा, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी २ हजार ३९३ जागा आणि कारागृह शिपाईसाठी ५८० जागांची भरती होणार आहे. अशा प्रकारे एकूण १५,६३१ पदे भरण्यात येणार आहेत. (Police Bharti Age Relaxation)
Police Bharti 2025 | उमेदवारांसाठी मोठा दिलासा :
या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध संघटनांकडून वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.






