Maharashtra Election 2025 | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (4 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. (Maharashtra Election 2025)
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, आयोगाने तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर
नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर 2025
छाननी: 18 नोव्हेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 21 नोव्हेंबर 2025
अंतिम उमेदवार यादी: 25 नोव्हेंबर 2025
मतदान: 2 डिसेंबर 2025
मतमोजणी: 3 डिसेंबर 2025
राज्यातील एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून, 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया ईव्हीएम (Electronic Voting Machine) द्वारे पार पडणार आहे.
Maharashtra Election 2025 | निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ :
या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली असून, वर्गानुसार वेगवेगळी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे –
‘अ’ वर्ग नगर परिषद:
अध्यक्षपदासाठी: ₹15 लाख
सदस्यपदासाठी: ₹10 लाख
‘ब’ वर्ग नगर परिषद:
अध्यक्षपदासाठी: ₹11.25 लाख
सदस्यपदासाठी: ₹3.50 लाख
‘क’ वर्ग नगर परिषद:
अध्यक्षपदासाठी: ₹7.50 लाख
सदस्यपदासाठी: ₹2.50 लाख
नगर पंचायत:
अध्यक्षपदासाठी: ₹6 लाख
सदस्यपदासाठी: ₹2.25 लाख
राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, ही खर्च मर्यादा पारदर्शकता आणि प्रामाणिक स्पर्धा राखण्यासाठी वाढवण्यात आली आहे.
मतदारांसाठी ऑनलाइन सोय :
मतदारांना सुलभ सुविधा देण्यासाठी आयोगाने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे. यामध्ये नागरिकांना खालील गोष्टी तपासता येतील –
मतदार यादीतील नाव
मतदान केंद्राची जागा
उमेदवारांची माहिती
या डिजिटल सुविधेमुळे मतदारांना मतदान दिनी गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






