Maharashtra Election Date | राज्यातील प्रलंबित महापालिका निवडणुकांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांसाठी मतदान आणि निकालाच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत. या निवडणुकांसाठी आजपासून राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हं दिसत आहेत. (Maharashtra Election Date)
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निवडणुकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा फैसला अवघ्या दोन दिवसांत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मतदान आणि निकालाचा संपूर्ण कार्यक्रम :
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे महापालिकांच्या सत्तासंघर्षाचा निर्णय झपाट्याने लागणार आहे. ( Municipal Corporation Polls)
या निवडणुकांमध्ये 27 महापालिकांची मुदत आधीच संपलेली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांसाठी प्रथमच निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी अंतिम मानण्यात आली आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यामुळे त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Election Date | मुंबईत एक सदस्यीय, इतर ठिकाणी बहुसदस्यीय वॉर्ड :
मुंबई महापालिकेत (BMC Election Date) एक सदस्यीय वॉर्ड पद्धत लागू राहणार असून, मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे. मात्र, उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे त्या-त्या वॉर्ड रचनेनुसार मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. (Maharashtra Election Date)
या निवडणुकांसाठी एकूण 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी मुंबईतच 10 हजार 111 मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर बॅलेट युनिट्स आणि कंट्रोल युनिट्सचा वापर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांना निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करणे बंधनकारक असेल.






