Municipal Elections 2025 | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून, या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या घोषणेच्या काही तास आधीच विरोधकांकडून मोठा ‘लेटर बॉम्ब’ फुटला आहे.
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेतली असून, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्यांमधील त्रुटींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मतदार याद्यांतील घोळावरून विरोधक आक्रमक :
विरोधकांनी आयोगाकडे एकूण नऊ मुद्द्यांचं पत्र सादर केलं असून, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नावांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “जोपर्यंत मतदार याद्यांमधील गोंधळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत,” अशी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेकडून करण्यात आली आहे. (Municipal Elections 2025)
या भेटीदरम्यान जवळपास अर्धा तास निवडणूक आयुक्तांशी चर्चा झाली. या चर्चेत विरोधकांनी आयोगावर दबावाखाली निर्णय घेण्याचा आरोप करत, निवडणुका लवकर जाहीर करण्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.
Municipal Elections 2025 | “दबावाखाली काम सुरू” – बाळा नांदगावकरांचा आरोप :
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं, “मतदार यादीतील जो घोळ आहे, तो जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मतदान घेऊ नका. आम्ही नऊ मुद्द्यांचं पत्र दिलं, पण आयोगानं कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. एकीकडे आई जेऊ घालेना, अन् बाप भीक मागू देईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दबावाखाली काम सुरू असल्याचं दिसतंय.”
विरोधकांकडून सातत्याने निवडणूक आयोगावर दबाव आणला जात असतानाच, आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.






