Local Body Elections | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरु झाली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता राज्य निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी (५ नोव्हेंबर) आयोग पत्रकार परिषद घेणार असून त्याच दिवशी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पत्रकार परिषदेतून राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. आयोगाकडून निवडणुकीची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली असून, प्रभाग आणि आरक्षणासंबंधी आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
मतदार यादीतील घोळावरून विरोधक आक्रमक :
निवडणुका जाहीर होण्याआधीच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या मते, मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त न करता निवडणुका घेणे अनुचित ठरेल. मात्र, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 पूर्वी सर्व स्थानिक निवडणुका पूर्ण करण्याचा आयोगाचा मानस आहे. त्यामुळे मतदार याद्या अंतिम झाल्या असून आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Local Body Elections | तीन टप्प्यांत पार पडणार राज्यातील निवडणुका :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 289 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. हा टप्पा साधारण 21 दिवसांचा असेल. दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील, तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्याच परिषदेतून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. एकदा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यभर आचारसंहिता लागू होईल.
पहिल्या टप्प्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका आधी घेतल्या जाण्याची शक्यता आहे. ईव्हीएम तपासणी, मतदार याद्या आणि आरक्षणासंबंधी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोग अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल. या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.






