आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार?

On: November 4, 2025 12:29 PM
Local Body Elections
---Advertisement---

Local Body Elections 2025 | राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज मोठी घडामोड घडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका रखडलेल्या असल्याने, आता अखेर निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश :

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकार आणि सर्वच राजकीय पक्ष तयारीच्या मोडमध्ये गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची योजना आखली आहे. (Local Body Elections 2025)

पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections 2025 | राजकीय पक्षांची तयारी, वातावरण तापले :

महापालिका निवडणुकीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. मतदार यादीतील त्रुटी आणि दुबार मतदारांच्या तक्रारींवरून काही पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आयोगाने ती फेटाळल्याचे कळते. आयोग कोर्टाने दिलेल्या मुदतीतच निवडणुका घेण्यावर ठाम असल्याचेही स्पष्ट होत आहे.

राज्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अलीकडेच चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्राथमिक टप्प्यात २९४ नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, ओल्या दुष्काळामुळे आणि पुरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेळेत न पोहोचल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका तीनही पक्षांसाठी मोठे राजकीय आव्हान ठरणार आहेत.

दुपारी ४ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष :

आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिकृत घोषणा होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आचारसंहिता कधी लागू होणार, निवडणुका कोणत्या टप्प्यात पार पडणार आणि निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title: Maharashtra Local Body Elections 2025: State Election Commission likely to announce Municipal Poll Dates today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now