Crime News | नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका सध्या एका थरारक प्रकरणाने हादरला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा जीव घेतला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी पत्नी आणि प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे.
अनैतिक संबंधात पती ठरला अडथळा :
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद किशन भगत (वय ५१) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विनोद भगत आणि त्याची पत्नी प्रियांका भगत हे गोकुंदा येथे वास्तव्यास होते. दरम्यान, प्रियांकाचे किनवट शहरातील ब्रोकरचं काम करणाऱ्या शेख रफीक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले. या नात्यात अडथळा ठरणाऱ्या विनोद भगत यांचा कायमचा काटा काढण्यासाठी दोघांनी खूनाचा कट रचला.
२९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ही घटना घडली. विनोद भगत दारूच्या नशेत असताना प्रियांका आणि शेख रफिक यांनी त्याला पैनगंगा नदीच्या खरबी पुलावर नेलं आणि दोघांनी मिळून त्याला नदीत फेकून दिलं. यात विनोदचा मृत्यू झाला. घटनेनंतर प्रियांकाने पती बेपत्ता असल्याची बनावट तक्रार ३ सप्टेंबरला किनवट पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र, मृताच्या बहिणी आणि भावाने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रकरणाचा धागा उकलू लागला.
Crime News | प्रियकराने दिली कबुली :
पोलिस तपासादरम्यान प्रियांकाच्या मोबाईलवर एका विशिष्ट क्रमांकावरून वारंवार कॉल आलेले आढळले. त्यामुळे संशयाची सुई थेट प्रियांकावर फिरली. तिच्या वागण्यातूनही पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी दिसल्या. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर पोलिसांनी शेख रफीकला ताब्यात घेतलं. चौकशीत पोलिसी खाक्या दाखवताच शेख रफीकने थेट गुन्ह्याची कबुली दिली. त्याने प्रियांका भगतसोबत पतीचा खून करण्याचा कट रचल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आणि तब्बल दीड महिन्यानंतर विनोद भगत यांच्या हत्येचं रहस्य उघड झालं.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. तपास पथकात पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे, फौजदार सागर झाडे, हेड कॉन्स्टेबल गजानन डुकरे, सदाशिव अनंतवार, संग्राम मुंडे, सिद्धार्थ वाघमारे, प्रदीप आत्राम तसेच महिला पोलिस मंगल कोरे आणि सुशीला जानगेवार यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या घटनेनं पुन्हा एकदा माणसातील नैतिकतेचा अंत दाखवून दिला आहे. प्रेमाच्या आहारी गेलेली प्रियांका आणि तिचा प्रियकर रफीक यांनी एका निर्दोष जीवाची हत्या केली.
समाजात अशा घटनांनी अस्वस्थता निर्माण केली असून ‘घोर कलियुग’ ही वाक्यं पुन्हा खरी ठरली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करत आरोपींना अटक केली असली तरी नांदेड जिल्ह्यात या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रियांका आणि रफीक यांच्यावर पुढील कारवाई सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. या हत्याकांडानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की, प्रेमाचं वेड जेव्हा अंधकारमय मार्गावर जातं, तेव्हा त्याचा शेवट फक्त मृत्यू आणि पश्चात्तापातच होतो.






