weather update | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रापर्यंत पसरल्याने राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर महिन्यात नेहमीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज याआधीच व्यक्त करण्यात आला होता. (Maharashtra weather update)
गेल्या २४ तासांत मराठवाड्यासह रायगड, पनवेल परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मात्र हा पाऊस सलग न पडता अधूनमधून मुसळधार स्वरूपात होत आहे. हवामान खात्याच्या मते, १४ सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना बसणार पावसाचा फटका? :
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांत अतिवृष्टी ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
weather update | पावसाचा परिणाम जनजीवन आणि शेतीवर :
वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला असून वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Maharashtra weather update)
चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा व चिमूर तालुक्यांत ग्रामीण रस्ते बंद झाले असून दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे.
परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे मुग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यावर असताना पावसामुळे मुग काळवंडत असून अळ्या-किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले असून, पावसाने उघडीप दिली नाही तर मुगाच्या एकूण उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.






