Weather Stations | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गावपातळीवर अचूक हवामान माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २५,५२२ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या केंद्रांमुळे पावसाचा अंदाज, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग याची माहिती थेट शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे मिळणार आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून जागा उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Stations)
फक्त ५३ टक्के ग्रामपंचायतींकडून जागा निश्चित :
राज्यातील एकूण २५,५२२ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत केवळ १३,४६३ ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून दिली आहे, म्हणजे फक्त ५३ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक विभाग या बाबतीत आघाडीवर असून ३,७८७ ग्रामपंचायतींनी जागा निश्चित केली आहे. संभाजीनगर विभागातील २,७३५ आणि ठाणे विभागातील फक्त ७७७ ग्रामपंचायतींनीच जागा दिली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींकडून अजूनही प्रतिसाद आलेला नाही.
कृषी विभागाने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्ट अखेरीस निविदा पूर्ण करून कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यानंतर एका महिन्यात जागांचे हस्तांतरण करून तीन महिन्यांत हवामान केंद्र उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु जागा वेळेत मिळाली नाही, तर प्रकल्प उशिरा सुरू होईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Maharashtra Weather Stations)
Weather Stations | सरकारी जागा नसेल तर खासगी जागा भाड्याने :
ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागा नसेल, तर खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. कृषी विभागाने यासाठी ग्रामविकास विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून, ग्रामपंचायतींचा उदासीन प्रतिसाद पाहता सतत पाठपुरावा केला जात आहे. (Weather Stations)
या हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मोबाईल अॅप, एसएमएस आणि ग्रामपंचायत स्तरावरून हवामान सल्ला मिळेल. त्यामुळे पेरणी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि कापणीसारखे निर्णय योग्य वेळी घेता येतील. अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत.






