Farmer Bonus | गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बोनस योजनेची (Farmer Bonus) अखेर अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अंतर्गत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच बँक खात्यावर थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
कोणाला मिळणार फायदा? पात्रतेच्या अटी स्पष्ट :
राज्य सरकारने या योजनेसाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बोनस थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ जून २०२५ पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत दोन हेक्टर (सुमारे ५ एकर) शेतीच्या धान विक्रीसाठी २० हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांवर धान विक्री केली असावी आणि ऑनलाइन नोंदणी झालेली असावी. आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत या नोंदणीची पडताळणी करण्यात आली आहे.
Farmer Bonus | उशीर झाल्याने नाराजी, आता अपेक्षा पूर्तीस होणार :
एकूण १ लाख ५६ हजार ४३२ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७६,२३४ शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे थेट धान विक्री केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून, बोनस वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
बोनस मिळण्यास उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, आता निधी वितरित करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत पैसे जमा होणार आहेत.






