Lakhpati Didi | महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, एक कोटी लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज देऊन ‘लखपती दीदी’ बनवले जाईल.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) आधीच महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक आधार देत आहे. मात्र, महिलांना केवळ या रकमेवर अवलंबून राहावे लागू नये, तर त्या उद्योग-व्यवसायात उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाने कर्जसहाय्याची नवी तरतूद केली आहे.
प्रत्येक गावात पतसंस्था, बँकेमार्फत कर्ज :
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, प्रत्येक गावात महिलांची पतसंस्था स्थापन केली जाईल. जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. यामुळे त्या स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय सुरु करून स्वावलंबी होऊ शकतील.
त्यांच्या मते, या उपक्रमातून राज्यातील एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. याआधी गेल्या वर्षीच 25 लाख महिलांना लखपती बनविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता, असेही त्यांनी सांगितले.
Lakhpati Didi | पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा :
मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसाशी जोडला. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ राबवण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून हे अभियान सुरु झाले. फडणवीस यांनी नमूद केले की, मोदींच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले असून, 15 कोटी लोकांना स्वतःचे घर मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वीही मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या भूमिकेवर भर दिला होता. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत महिलांचा सहभाग अत्यावश्यक आहे आणि ‘बेटी बचाव’पासून ‘लखपती दीदी’पर्यंत अनेक योजना हाच विचार पुढे नेत आहेत.






