Maharashtra Cabinet Decisions | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जनहिताशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यात नगरपरिषद अधिनियमातील सुधारणा आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा निर्णय विशेष लक्षवेधी ठरतो.
आचारसंहितेमुळे थेट लाभाच्या घोषणा मर्यादित असल्या तरी प्रशासनिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर कोणताही अडसर नसल्याने आजच्या बैठकीत राज्याच्या कारभाराला दिशा देणारे निर्णय मंजूर करण्यात आले.
नगरपरिषद अधिनियमात ऐतिहासिक बदल :
राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणेनुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis cabinet news)
या बदलासाठी अध्यादेश काढण्यात येणार असून, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही अधिक बळकट होईल, असा सरकारचा दावा आहे. नगरविकास विभागामार्फत ही सुधारणा अमलात आणली जाणार आहे.
Maharashtra Cabinet Decisions | धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभारणार :
राज्य मंत्रिमंडळाने धाराशिव जिल्ह्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक उभारणीला मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची 1 एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक संदेश जाणार असल्याचे मानले जात आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्राम, तालुका आणि जिल्हा प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 आणि सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागामार्फत राबवला जाणार आहे. (Maharashtra Cabinet Decisions)
तसेच राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे आरोग्य सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय :
– ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार.
– जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागात कार्यरत व सेवानिवृत्त बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करणार.
– धाराशिव येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe memorial) यांच्या स्मारकासाठी 1 एकर जमीन देणार.
– महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा; थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा अधिकार.
राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयांमुळे प्रशासनिक सुधारणांना गती मिळणार असून, सामाजिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






