Pankaj Dheer Death | मनोरंजनविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ‘महाभारत’ या प्रसिद्ध मालिकेत कर्णाची अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व शोकसागरात बुडालं आहे. त्यांनी साकारलेला ‘कर्ण’ आजही लाखो प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. (Pankaj Dheer Death)
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. काही काळ त्यांनी आजारावर मात केली होती, मात्र अलीकडे पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांची प्रकृती बिघडली. अखेर बुधवारी (15 ऑक्टोबर 2025) सकाळी 11.30 वाजता त्यांचं निधन झालं. महाभारतात अर्जुनाची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी दिली. त्यांनी लिहिलं, “गुड बाय जेन्टलमन, तुझी खूप आठवण येईल पीडी.”
कॅन्सरशी लढा देत काळाच्या पडद्याआड :
पंकज धीर यांनी आपल्या आयुष्यात अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. पण ‘महाभारतातील कर्ण’ ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय भूमिका ठरली. त्यांच्या संवाद delivery, भावनांचा आविष्कार आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी हा पौराणिक पात्र खऱ्या अर्थाने जिवंत केला.
पंकज धीर यांनी काही महिन्यांपूर्वी मोठी सर्जरीही केली होती. आजाराशी लढताना ते मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर राहिले. मात्र, अखेरीस या लढाईत त्यांनी माघार घेतली. त्यांच्या जाण्याने दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील एक तेजस्वी पर्व संपल्याची भावना चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Pankaj Dheer Death | कर्णाच्या भूमिकेमागची गोष्ट :
‘महाभारत’ मालिकेचे दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांनी सुरुवातीला पंकज धीर यांची निवड ‘अर्जुन’च्या भूमिकेसाठी केली होती. त्यांनी करारावर सहीदेखील केली होती. मात्र, अर्जुनच्या ‘बृहन्नला’ अवतारासाठी मिश्या काढाव्या लागतील, असे सांगितल्यावर पंकज धीर यांनी नकार दिला. त्यांना वाटले की मिश्या काढल्यास त्यांचा चेहराच पूर्णपणे बदलेल. (Pankaj Dheer Death)
यानंतर काही दिवसांनी चोप्रा यांनी त्यांना ‘कर्ण’ची भूमिका ऑफर केली — आणि हाच निर्णय पंकज धीर यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या भूमिकेमुळे त्यांनी अमरत्व मिळवलं. आजही टीव्हीवरील ‘महाभारत’ पुनर्प्रसारण होताना त्यांच्या संवादांवर प्रेक्षक टाळ्या वाजवतात.






