Success Story | उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ (Lucknow) येथील अनुष्का जयस्वालने (Anushka Jaiswal) एक वेगळा मार्ग निवडला आहे. २०१७ मध्ये चांगल्या नोकरीच्या संधी नाकारून तिने शेतीमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. गच्चीवरील लागवडीतून मिळालेल्या प्रेरणेने तिने आज शेतीत मोठे यश मिळवले असून तिची उलाढाल कोटींमध्ये पोहोचली आहे.
कॉर्पोरेट नोकरीला नकार आणि शेतीची आवड
२०१७ मध्ये दिल्ली (Delhi) येथील हिंदू कॉलेजमध्ये (Hindu College) कॅम्पस प्लेसमेंट सुरू असताना अनुष्काला (Anushka Jaiswal) चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, तिने मिळालेल्या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत, कारण तिचे ध्येय शेतीमध्ये काहीतरी मोठे करण्याचे होते. यापूर्वी तिने सेंट स्टीफन्स कॉलेजमधून (St. Stephen’s College) फ्रेंच भाषेचा अभ्यास केला होता, परंतु त्यात तिला समाधान मिळाले नाही आणि ती घरी परतली.
तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली जेव्हा तिने गच्चीवर टोमॅटोसह काही रोपे लावली आणि तिला त्या कामात आनंद मिळू लागला. भावाच्या प्रोत्साहनामुळे तिने नोएडामधील (Noida) इन्स्टीट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये (Institute of Horticulture Technology) प्रवेश घेतला. तिथे फलोत्पादनाचा (Horticulture) रीतसर कोर्स पूर्ण केल्यावर आणि इतर संबंधित अभ्यासक्रम केल्यानंतर शेतीमधील तिची आवड आणखी वाढली.
Success Story | पॉलीहाऊस शेतीतून कोटींची उलाढाल
२०२० मध्ये अनुष्काने एक एकर जमिनीवर पॉलीहाऊस फार्म सुरू करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तिने प्रथम काकडीची लागवड करून ५१ टन उत्पादन घेतले, जे पारंपारिक शेतीच्या तुलनेत जवळपास तिप्पट असल्याचा तिचा दावा आहे. या सुरुवातीच्या यशानंतर तिने लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरचीचे (Shimla Mirchi) उत्पादन घेतले. एका एकरातून ३५ टन उत्पादन घेत तिने ते ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विकले.
आज अनुष्का सहा एकरपेक्षा जास्त जमिनीवर भाजीपाला पिकवते आणि दरवर्षी २०० टनांहून अधिक ढोबळ्या मिरचीचे उत्पादन करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३-२४ मध्ये तिची उलाढाल १ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तिच्या भाज्या लुलू हायपरमार्केट (Lulu Hypermarket) तसेच ब्लिंकिट (Blinkit) आणि बिग बास्केट (Big Basket) सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जातात. दिल्ली (Delhi) आणि वाराणसी (Varanasi) येथेही तिच्या मालाची निर्यात होते. या उद्योगातून तिने २५ ते ३० कामगारांना रोजगार दिला असून, त्यात बहुतांश महिलांचा समावेश आहे.






